ध्यान केंद्र
जीवनाला दिव्यत्वाचा सौंदर्यस्पर्श व्हावा, ते उमलावं, फुलावं आणि आनंदपूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असतं.
चित्त चैतन्यमय झाल्याने हे होतं, याची अनुभूती पूर्वापार योगी आणि सत्पुरुष घेत आले आहेत.
गीतेमध्ये हाच मध्यवर्ती ध्यानयोग-प्रक्रियेचा मार्ग सांगितला आहे. ‘मन आत्मसंस्थ करून इतर काहीही न चिंतणे’ हेच स्वरूपानुसंधान!
या साधनेच्या स्थितीला जे पूरक आहे ते साधकांना उपलब्ध व्हावे आणि साधकांची बैठक तयार व्हावी, यासाठी स्वामींच्या प्रेरणेने ही ध्यानकेंद्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने चालवली जातात.
ध्यान केंद्र पेज वरती उपलब्ध असलेले सखोल ध्यान प्रक्रिया विवरण, स्वामीजींचे ध्यान व आसन निरूपण ह्याचा साधकाने लाभ घ्यावा. तसेच वेबसाईत वर आपल्याला स्वामीजींचे व साधकांचे अनेक resources उपलब्ध राहतील, जे आपण पाहू शकता.
- शुक्रवार ध्यानकेंद्र, भांडारकर रोड, पुणे. शुक्र. सायंकाळी ७.३० ते रात्री ९ (श्री. योगेश काळे)
- शनिवार ध्यानकेंद्र आणि सत्संग, कर्वेनगर पुणे, पहिला आणि तिसरा शनिवार, सकाळी ७ ते ८.३० (डॉ. श्री. गजानन नाटेकर) पुढे वाचा…
आगामी केंद्र
- श्री. योगेश काळे - ९८९०४४७५४७
- डॉ. श्री. गजानन नाटेकर - ९९६०३९२७०५
- डॉ. श्री. हिमांशू वझे (स्वरुपयोग ऑफिस) - ०२०-२५६५२४५७
- सौ. स्वाती दामले - ९९३०४७८०७३
आमच्याशी संपर्क साधा
ध्यान प्रक्रीया विवेचन
"शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया। आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥" भगवद्गीता अ. ६, श्लो. २५
जो ईश्वर सर्वत्र आहे तोच आपल्या आतमध्ये देह, मन, बुद्धी यांच्या पलीकडे असलेल्या शुद्ध अस्तित्वाच्या रूपाने आहे.
त्याची अनुभूती घेण्यासाठीची मध्यवर्ती ध्यानप्रक्रिया भगवद्गीतेत वरील श्लोकात सांगितली आहे आणि सर्व संतांनी आचरून ती सिद्ध केली आहे. एका जागी स्थिर बसून सहजासन घालावे.
चांगले ध्यान लागायचे असेल तर साधकाला योग्य बाह्य (शारीरिक) आणि अंतर्गत (मानसिक) वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
- गोंधळ, गोंगाट आणि कोणतेही विचलित नसलेले स्वच्छ क्षेत्र निवडावे,सुयोग्य बाह्य मुद्रा:
- बैठक शक्यतो जमिनीपासून खूप उंच किंवा खूप खाली असू नये
- बसायला खाली स्वच्छ कापड किंवा कुशन घ्यावे
- पाठ आणि खांदे सरळ ठेवावेत, ज्याने सजगपणे बसता येईल, पण शरीरावर कुठला अतिरिक्त ताण निर्माण होणार नाही अशी काळजी घ्यावी
- डावा पाय शरीराच्या जवळ, शरीराच्या मध्यभागी घ्यावा
- दोन्ही मांड्या जमिनीवर सपाट असाव्यात
- उजव्या पायाचा घोटा डाव्या पायावर अशा पद्धतीने ठेवावा, की उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या घोट्याच्या आणि टाचेच्या मधील पोकळीत हळुवारपणे विसावली असेल.
- पोट जमेल तितके सहज आतमध्ये घ्यावे ज्याने शरीर सरळ ठेवायला मदत होईल आणि पाठीला बाक निर्माण होणार नाही
- दोन्ही कोपर शक्यतो शरीराला लागून ठेवावेत आणि पंजे एकमेकांवर हलकेच विसावून, शरीराच्या मध्यभागी, बेंबीपाशी ठेवावेत
- याला सहजासन देखील म्हटले गेले आहे, ज्यात शरीराचा कुठलाही भाग अथवा नस दाबली जात नसून मुंग्या येणे किंवा रग लागणे इत्यादी व्याधी निर्माण होत नाहीत आणि शरीराची स्थिती स्थिर ठेवून, अत्यंत सावध व सक्षम राहून, साधक “स्व”वर उत्तमपणे लक्ष केंद्रित करू शकतो. याला आसनस्थैर्य असे देखील म्हटले जाते.
सुयोग्य अंतर्गत मुद्रा:
- शरीर स्थैर्यानंतर मन स्थिर ठेवण्यासाठी अनुकूल आंतरिक वातावरण साधकाला आवश्यक आहे
- त्यासाठी शक्यतो डोळे बंद करणे श्रेयस्कर आहे, व डोळ्यांच्या बुबुळांची यापुढे कुठली हालचाल अभिप्रेत नाही, कारण काही वस्तू पाहण्याचा प्रश्न नाही
- श्वासोच्छवासाची गती आणि विचारांचा प्रवाह यांचा थेट संबंध लक्षात घेता, मनातील विचारांचे प्रमाण आणि सतत प्रवाह कमी करून, स्वतःमध्ये लक्ष वळवण्यासाठी जाणीवपूर्वक काही खोल श्वास घ्यावेत.
- भ्रूमध्याच्या ठिकाणी अवधान केंद्रित करावे आणि साधकांनी पुढील प्रक्रियेकडे, लक्षपूर्वक आणि समजून घेऊन, वाटचाल करावी. ध्यानाची सविस्तर प्रक्रिया या पृष्ठावरील “ध्यान प्रक्रिया” विभागात वाचता येईल आणि “स्वामीजींचे ध्यान निरूपण” ऐकून समजून घेता येईल.
बुद्धीने मनाचे नियंत्रण करून, इतर कुठलेही विचार न करता, अवधान मन-बुद्धीसहित भ्रूमध्यापाशी (म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये थोडे वरच्या बाजूला) केंद्रित करावे. भ्रूमध्याला ईश्वराच्या अनुभूतीचे ठिकाण सांगितले गेले आहे.
ॐ, सोऽहम्, श्रीराम अशा एखाद्या छोट्या नाममंत्राचा उच्चार ईश्वराच्या अस्तित्वाच्या भावासहित (धारणेसहित) मनातल्या मनात करावा आणि त्या मंत्राला सहज शक्य असेल तर श्वासावर बसवावे. उदा. श्वास घेताना ‘सः’ म्हणजे ‘परमात्मा’ आणि सोडताना ‘अहम्’ म्हणजे ‘शुद्ध मीचे स्फुरण’ (consciousness of True Self) या धारणेसहित लक्ष एकाग्र करून, सजग राहून भ्रूमध्यापाशी अवधान ठेवणे आणि ‘स्व’चा (True Self / pure existence) वेध घेणे म्हणजेच सोऽहम् ध्यानप्रक्रिया होय.
पुढे याच मंत्राची श्वासागणिक पुनरावृत्ती होते, शुद्ध अस्तित्वभावाची अथवा ईश्वरभावाची धारणा धरता धरता ती दृढ होते आणि पुढे तिचंच ध्यानात पर्यवसान होतं. पुढे पुढे श्वासाच्या लयीत मंत्र चालू असला तरी त्या स्फुरणाची जाणीव भ्रूमध्य ते टाळू या भागात कुठेतरी स्थिर होते.
मन चंचल आहे, एका जागेवर स्थिर व्हायला ते सहज मानत नाही;
तरी हाच प्रयत्न, अस्तित्वाच्या जाणिवेच्या मदतीने म्हणजेच अस्तित्वभाव धरून त्यात मनाला स्थित करून सातत्याने करावा लागतो.
नुसताच नाममंत्र चालवणे अथवा शून्यात (blank or zero state of mind) मन स्थित करणे किंवा फक्त ईश्वराबद्दल वा अस्तित्वाबद्दल विचार करणे हे अभिप्रेत नसून शुद्ध अस्तित्वभाव अथवा ईश्वरभाव, मन-बुद्धीसहित भ्रूमध्यापाशी धारण करून त्या ठिकाणी कुठलीही शारीरिक अथवा मानसिक हालचाल न करता स्थिर राहणे हे ध्यानप्रक्रियेचे विशेष अंग आहे.
अस्तित्व अथवा ईश्वरतत्त्व हे मन-बुद्धीपलीकडे असून, त्याचा अनुभव घेण्यासाठी मन-बुद्धीचेच साहाय्य घ्यावे लागते.
तत्त्व थेट धरता येत नाही, पण तत्त्वाची अथवा अस्तित्वाची जाणीव (consciousness), साधकाला निश्चित आणि योग्य ध्यान-प्रयत्नांनी, करता करता स्पष्ट होऊ लागते आणि ती जाणीव क्रमाक्रमाने अस्तित्वापर्यंत घेऊन जाते.
भगवान रमण महर्षींनी या प्रक्रियेला ‘find out who am I’ (‘स्व’च्या अस्तित्वाचा वेध), तर निसर्गदत्त महाराजांनी त्याला ‘I am that’ (शुद्ध अस्तित्व), आणि स्वामीजींनी ‘Sensing of self’ (अस्तित्वाच्या जाणिवेच्या साह्याने ‘स्व’चा म्हणजेच अस्तित्वाचा वेध घेणे) इथपासून ‘Be with the Self’ (‘स्व’ला धरून राहणे) ही ध्यानप्रक्रिया सहज सोप्या भाषेत सर्वांपर्यंत आणली आहे.
ध्यान निरूपण
ध्यान प्रक्रिया प्रवचन
ध्यान आसन
ध्यान आसन प्रवचन