संक्षिप्त जीवनचरित्र - २४ ऑगस्ट १९५१ - २९ एप्रिल २०२१
स्वामी माधवानंद (पूर्वाश्रमीचे डॉ. माधव बाळकृष्ण नगरकर) हे भगवान श्रीआदिनाथांपासून श्रीज्ञानेश्वर महाराज आणि पुढे स्वामी स्वरूपानंद (पावस) यांच्याकडून स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथ संप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी होते.
डॉ. माधव नगरकर यांनी पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून वनस्पतिशास्त्रातील कवकशास्त्र अर्थात मायकॉलॉजी या विषयात लायकेन्स या वनस्पतीवर्गावर संशोधन केले. त्याबद्दल त्यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. त्यानंतर १९८७-८८ मध्ये त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट येथे पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळवून लायकेन्स या विषयात डॉ. मेसन हेल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढे त्यांनी ब्रिटिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, लंडन आणि म्युनिक बोटॅनिकल गार्डन्स, जर्मनी येथेही या विषयात काम केले. १९८९ पासून पुढे त्यांनी मशरूम कल्टिवेशन या विषयात संशोधन केले.
स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांनी राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म यांची सांगड घातली, युवांमध्ये अफाट कार्य उभे केले, हीच स्वामीजींच्या लोकोत्तर कार्याची मूळ प्रेरणा आहे. या प्रेरणेला जोड लाभली स्वामीजींच्या विलक्षण संशोधन वृत्तीची, ज्यातून भारतीय अध्यात्मशास्त्राचे सार स्वामीजींनी आज आपल्यापुढे खुले केले आहे.
आपल्या अंतरात ‘स्व’चा म्हणजेच ईश्वराचा शोध घेणे हा भारतीय अध्यात्मशास्त्राचा गाभा आहे.
आजच्या वैज्ञानिक युगात गूढतेशिवाय शास्त्रशुद्ध पद्धतीने हा गाभा विशेष करून युवा पिढीपर्यंत पोचवता यावा, यासाठी स्वामीजींनी १९९७ साली ‘स्वरूपयोग प्रतिष्ठान’ची स्थापना केली. आध्यात्मिकता, नैतिकता व राष्ट्रीयत्व ही स्वरूपयोग प्रतिष्ठानची त्रिसूत्री आहे. अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व यांची शास्त्रशुद्ध सांगड घालून युवकांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न संस्था करत आहे
संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीमद् दासबोध, पातंजल योगसूत्रे, संतवाङ्मय आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनचरित्रांवर स्वामीजींची निरूपणे आणि युवा-स्वाध्याय होतात. त्यांतून योग, भक्ती, ज्ञान आणि प्रखर राष्ट्रीयत्व यांचा सुंदर समन्वय साधला जातो. स्वामीजींनी युवा स्वाध्यायांवर विशेष भर दिला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अथवा समर्थांची एखादी ओवी घ्यावी, त्यात बुडी मारावी आणि सर्वांगांनी त्यावर आपले चिंतन व्यक्त करावे अशा प्रकारे केंद्रांमधून स्वाध्याय सादर केले जातात.
स्वामीजींनी अध्यात्मपर विपुल वाङ्मय निर्माण केले आहे. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्यायांवरील विवरण ग्रंथ, नित्य उपासना आणि पठण यांसाठी अर्थांसहित अनेक पुस्तिका, श्रीगजानन महाराज, तुकाराम महाराज, स्वामी स्वरूपानंद, श्रीमुकुंदराज यांच्या वाङ्मयावरील त्यांचे विवरण-ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच साधकांना पडण्याऱ्या प्रश्नांची उत्तरे, ध्यानप्रक्रिया आणि अष्टांगयोग विवरण-ग्रंथ, रामरक्षा, अथर्वशीर्ष या नित्य पठणातील स्तोत्रांचे अर्थासहित विवरण अशा अनेक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे.
‘रामकृष्ण-विवेकानंद आणि आपण’, ‘असामान्य लोकमान्य’, ‘दासबोधातील नवविधा भक्तींचे विवरण’, ‘समर्थांचा जाणता परमार्थ’ आणि ‘दासबोधातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयांवरील ध्वनिमुद्रणे संस्थेकडे उपलब्ध आहेत. स्वरूपयोग प्रतिष्ठानचे त्रैमासिक १९९७पासून देश-परदेशांतील हजारो साधकांपर्यंत पोचते. प्रपंच आणि परमार्थ, राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म यांचा सहजसुंदर व प्रेरणादायी मिलाप स्वामीजींच्या जीवनशैलीतून आणि वाङ्मयातून व्यक्त होतो.
‘स्व’चा शोध घेण्याच्या प्रक्रियेलाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ध्यानयोगाचा अभ्यास व आचरण करणारी प्रत्येक व्यक्ती उदात्त विचारसरणीची, व्यापक बुद्धिनिष्ठ व आत्मनिष्ठ व्हावी या भूमिकेतून स्वामी माधवानंद यांनी स्वरूपयोगच्या माध्यमातून समाजशिक्षणाचे उदंड कार्य केले.