उपासना शिबीरे
आध्यात्मिक विकास कार्यशाळांचे आयोजन
ध्यानावर मुख्य लक्ष केंद्रित करून, नाथ संप्रदायाच्या ध्यानयोग शाखेच्या स्वामीजींच्या उत्तराधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षातून अनेक वेळा अध्यात्मिक कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
साधकांना ध्यानप्रक्रिया समजण्यास मदत करणे, त्यांच्या साधनेसाठी अनुकूल आणि समान विचारसरणीचे वातावरण निर्माण करणे आणि कर्म, ध्यान, भक्ती आणि ज्ञान यांचा ईश्वरप्राप्तीसाठी लागणारा जीवनातील समन्वय समजून घेण्यास मदत करणे ही यामागची मुख्य धारणा आहे.
या कार्यशाळांमध्ये शास्त्रशुद्ध आणि मध्यवर्ती “उपासनेवर” लक्ष केंद्रित केले जाते, ज्याचा उद्देश कोणताही अनुचित गूढवाद काढून टाकणे व साधकाला ध्यानाच्या अचूक प्रक्रियेची मजबूत मूलभूत समज निर्माण करण्यास मदत करणे हा होय. त्याचबरोबर अनेक सत्रे साधकाच्या बुद्धीला सर्वोतपरी विचार करण्यासाठी देखील भाग पाडणारी असतात.
साधारणपणे वर्षभरात दर 2 महिन्यांनी एकदा कार्यशाळा घेतल्या जातात. शुल्क नाममात्र असते आणि केवळ अन्न व निवासासाठी कमीत कमी खर्च-शुल्क तेवढे आकारले जाते. आश्रम आणि त्याच्या परिसरात एका वेळी ६० ते १०० निवासी साधकांना राहण्याची सोय आहे. नोंदणीनंतर स्वरूपयोग द्वारे वाहतूक व्यवस्था (बस) केली जाते तसेच कार्यशाळेदरम्यान सर्व खाण्यापिण्याची योग्य सोय आश्रमात असते.
सर्व स्वयंसेवक जे त्यांची “सेवा” देऊ इच्छितात त्यांचे स्वागत असते आणि ते मदत करू शकतील अशी पुरेशी जागा आणि संधी त्यांना नेहमीच उपलब्ध असते. शिबिरे एक दिवसीय किंवा निवासी अशा दोन्ही स्वरूपांची असतात आणि साधक आपल्या सोयीनुसार नाव नोंदणी करू शकतात. परिसर मोठा आहे, निसर्गाच्या कुशीत आहे आणि साधकांच्या ध्यान साधनेच्या उद्देशाने स्वामीजींच्या स्फुरणातून उभारलेला आहे. त्यामुळे त्याचे पवित्र टिकवून ठेवून “ईश्वर साधने”व्यतिरिक्त इतर मनोरंजनात्मक कोणत्याही गप्पागोष्टी येथे अभिप्रेत नाहीत.
युवा विकास - युवा आणि बाल शिबिरे
वर्षातून सुमारे ३-४ वेळा, स्वरूपयोग प्रतिष्ठान लहान मुलांसाठी आणि युवांसाठी कार्यशाळा आयोजित करते. आध्यात्मिक आणि राष्ट्रीयत्व विकास हे या शिबिरांचे मूलभूत अंग आहे आणि त्यासाठी लागणारा मानसिक आणि शारीरिक विकास कसा करून घेता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते.
ध्यान साधना, जवळच्या किल्ल्यांवर ट्रेकिंग, फिटनेस गेम्स, पारंपारिक शस्त्रे, नाणी, सर्पमित्र आणि इतर अनेक विषयांवरील प्रात्यक्षिके यासारख्या अनेक activities इथे वेगवेगळ्या स्तरांमधून घेतल्या जातात. शिबिरांचा संपूर्ण पाया स्वामीजींनी आखून दिलेल्या अध्यात्मिक धरणांवर उभारला आहे, ज्याने अगदी लहानपणापासूनच आपल्याभोवती सकारात्मक आणि प्रगतीशील वातावरण आपणच कसे तयार करू शकतो हे समजून घेण्यास ही शिबिरे मदत करतात.
या कार्यशाळा मुलांसाठी आणि पालकांसाठी सारख्याच जाहीर केल्या जातात. लहान मुलांना वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करता येते, अनेक नवीन मित्र बनवता येतात आणि आपल्या देशाची समृद्ध संस्कृती, खरा इतिहास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध अध्यात्म सहज सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहचवले जाते.
उपासना ही सर्वांची गुरुकिल्ली आणि पाया आहे
उपासना (प्रार्थना) हे सर्व गोष्टींचे सार आहे. प्रबळ विश्लेषणात्मक (analytical) मनासाठी चर्चा आणि प्रवचन सत्रे आयोजित केली जातात, ज्यांमध्ये त्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीला आणि तर्कशक्तीला उत्तेजन मिळते, तर भावनाप्रधान अंतःकरणासाठी येथे प्रार्थना, आरती, अभंग आणि दिंडी यांद्वारे परमेश्वराची उपासना घडते. एखाद्याचा कर्मावर विश्वास असेल तर त्यासाठी आश्रमात “सेवे”द्वारे योगदान देण्याची सोय आहेच. मनाचा स्वभाव काहीही असो, शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे बरेच काही आहे आणि विशेष समजण्याचा भाग असा आहे की उपासना किंवा साधना हा अखंड करण्याचा भाग आहे. “साधने”द्वारे स्वतःला कसे घडवता येईल, ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर पुढे कसे चालत राहता येईल, याची भक्कम समज आणि त्यातून एक विलक्षण बळ साधकाला प्राप्त होते आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट साधनेच्या भक्कम पायावर उभारावी आणि आध्यात्मिक मार्गावर अखंड चालत राहावे ही प्रेरणा निर्माण होते. स्वामी माधवनाथ म्हणायचे “आपण काय केले पाहिजे? ... साधना, साधना आणि अखंड साधना!”
स्वाध्याय
कार्यशाळेदरम्यान साधकांना गटचर्चेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते; तसेच काहींना राष्ट्रीयत्व, अध्यात्म किंवा व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित असलेल्या विशिष्ट श्लोक किंवा विषयावर अभ्यास मांडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
श्रीमद् भगवद्गीतेसारख्या मध्यवर्ती ग्रंथांपैकी एक किंवा दोन श्लोक किंवा ध्यानाशी संबंधित प्रश्न निवडण्यास मदत करून स्वामीजींनी सर्व साधकांना ‘स्वाध्याय’ सादर करण्यास नेहमीच प्रोत्साहित केले आहे. स्वाध्याय करता करता जे अनेक प्रश्न पडतात, त्यांसाठी लागणारे मार्गदर्शन, त्यावर चर्चा आणि त्यामधून मार्ग काढण्यास मदत या स्वाध्यामालेतून केली जाते.
कार्यशाळांचा एक भाग म्हणून, साधकांना स्वामीजींचे ध्वनिमुद्रित प्रवचन तसेच उत्तराधिकारी मंडळींचे प्रवचन ऐकायला व पाहायला मिळते. सर्व प्रवचनांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आत्म-साक्षात्काराच्या मार्गाचे तार्किक स्पष्टीकरण दिले जाते.
त्या प्रवचनांचा प्रेरणास्रोत श्रीमद् भगवद्गीता, श्रीमद् दासबोध, पतंजली योगसूत्र आणि ज्ञानेश्वरी यांसारख्या मूलभूत आध्यात्मिक ग्रंथांमधून येतो आणि साधकाला स्वतःचा आध्यात्मिक विकास करण्याची एक उत्तम संधी प्राप्त होते.
इतर कार्यक्रम
कला व नृत्य सादरीकरण, दिंडीचे कार्यक्रम, योगासने व व्यायाम सत्र, कधी युक्त आहार विहाराला धरून विशेष सत्र असे अनेक अन्य कार्यक्रम देखील शिबिरांमधून आयोजित केले जातात. त्याचबरोबर गटचर्चा आणि संबंधित मार्गदर्शन देखील येथे घेतले जाते. मध्यवर्ती ध्यान उपासना, नामस्मरण, स्तोत्र पठण आणि आरती ह्याबरोबरच हे अन्य कार्यक्रम घेतले जातात.