स्वरूपयोगाश्रम
स्वरूपयोगाश्रम सर्व आध्यात्मिक साधकांसाठी खुला आहे. तुम्ही या पेजवर दिसलेल्या इमेजवर क्लिक करून पुढील एक्सप्लोर करू शकता. आश्रमाची दिशा येथे क्लिक करून मिळू शकते
शिबीर कार्यक्रम विडिओ
संकल्पना
मनुष्याला निसर्गतःच शांती आणि समाधानाची एक आंतरिक ओढ जाणवत असते. अंतरातील समाधान विकसित करायचं असेल तर त्याचा शोध अंतरातच घ्यायला हवा. हाच ईश्वराचा शोध!
या स्व-संशोधनाच्या मार्गावर ध्यानयोगाच्या साहाय्याने भरारी घेण्यासाठी जिथे योगमार्गाची अचूक शिकवण देता येईल अशी निसर्गरम्य, शांत आणि पवित्र वास्तू असावी या स्वामी माधवानंद यांच्या संकल्पनेतून पुण्याहून अवघ्या तासाभराच्या अंतरावर, मावळात, गिरिवन प्रकल्पाच्या अंतर्गत, शिवम डोंगराच्या कुशीत साकारलेलं, आपल्या प्राचीन गुरु-शिष्य परंपरेची मूल्यं पुनरुज्जीवित करणारं स्वप्न म्हणजेच स्वरूपयोगाश्रम!
आगामी शिबीरे
स्वरूपयोगाश्रम सर्व साधकांसाठी नित्य खुला करण्यात आहे. खाली नमूद केलेल्या कुठल्याही दूरध्वनीवर संपर्क करून, पूर्व कल्पना व परवानगी घेऊन आपण ध्यानसाधना व उपासनेसाठी येऊ शकता. स्वरूपयोग प्रतिष्ठान दरवर्षी डिसेम्बर ते एप्रिल या काळात अध्यात्म-शिबिरे आयोजित करते. त्याशिवाय महाशिवरात्री, रामनवमी यांसारखे विशेष उत्सव तेथे साधना करून साजरे केले जातात. आगामी शिबिरांच्या तारखा वेळोवेळी कळवण्यात येतील.
संपर्क: स्वरूपयोग कार्यालय दूरध्वनी - +91-02025652457
श्री. जयंत आपटे - +91-9423267725
श्री. चैतन्य देशपांडे - +91 9011013819
Modal body text goes here.
- Login
- Sign Up
स्वामी माधवानंद यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते, त्यांतील काही खालीलप्रमाणे-
१. आध्यात्मिक क्षेत्रातील मूलभूत कार्यासाठी - सज्जनगडच्या श्रीसमर्थ सेवा मंडळातर्फे ‘श्रीसमर्थ संतसेवा पुरस्कार’
२. सोलापूरच्या श्रीसंत साहित्य सेवा संघातर्फे ‘पुरुषोत्तम संतसेवा गौरव पुरस्कार’
३. अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘समाजशिक्षक पुरस्कार’
४. शाहू मोडक प्रतिष्ठानचा ‘शाहू मोडक स्मृती पुरस्कार’
५. चैतन्य ट्रस्टतर्फे ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’
६. गीता धर्म मंडळातर्फे ‘गीता गौरव पुरस्कार’
७. ब्राह्मण साहाय्यक संघ, याज्ञवल्क्य आश्रम या संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
संक्षिप्त जीवनचरित्र - २४ ऑगस्ट १९५१ - २९ एप्रिल २०२१
स्वामी माधवानंद (पूर्वाश्रमीचे डॉ. माधव बाळकृष्ण नगरकर) हे भगवान श्रीआदिनाथांपासून श्रीज्ञानेश्वर महाराज आणि पुढे स्वामी स्वरूपानंद (पावस) यांच्याकडून स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथ संप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी होते.
डॉ. माधव नगरकर यांनी पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून वनस्पतिशास्त्रातील कवकशास्त्र अर्थात मायकॉलॉजी या विषयात लायकेन्स या वनस्पतीवर्गावर संशोधन केले. त्याबद्दल त्यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. त्यानंतर १९८७-८८ मध्ये त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट येथे पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळवून लायकेन्स या विषयात डॉ. मेसन हेल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढे त्यांनी ब्रिटिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, लंडन आणि म्युनिक बोटॅनिकल गार्डन्स, जर्मनी येथेही या विषयात काम केले. १९८९ पासून पुढे त्यांनी मशरूम कल्टिवेशन या विषयात संशोधन केले.
स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांनी राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म यांची सांगड घातली, युवांमध्ये अफाट कार्य उभे केले, हीच स्वामीजींच्या लोकोत्तर कार्याची मूळ प्रेरणा आहे. या प्रेरणेला जोड लाभली स्वामीजींच्या विलक्षण संशोधन वृत्तीची, ज्यातून भारतीय अध्यात्मशास्त्राचे सार स्वामीजींनी आज आपल्यापुढे खुले केले आहे.
आपल्या अंतरात ‘स्व’चा म्हणजेच ईश्वराचा शोध घेणे हा भारतीय अध्यात्मशास्त्राचा गाभा आहे.
आजच्या वैज्ञानिक युगात गूढतेशिवाय शास्त्रशुद्ध पद्धतीने हा गाभा विशेष करून युवा पिढीपर्यंत पोचवता यावा, यासाठी स्वामीजींनी १९९७ साली ‘स्वरूपयोग प्रतिष्ठान’ची स्थापना केली. आध्यात्मिकता, नैतिकता व राष्ट्रीयत्व ही स्वरूपयोग प्रतिष्ठानची त्रिसूत्री आहे. अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व यांची शास्त्रशुद्ध सांगड घालून युवकांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न संस्था करत आहे
संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीमद् दासबोध, पातंजल योगसूत्रे, संतवाङ्मय आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनचरित्रांवर स्वामीजींची निरूपणे आणि युवा-स्वाध्याय होतात. त्यांतून योग, भक्ती, ज्ञान आणि प्रखर राष्ट्रीयत्व यांचा सुंदर समन्वय साधला जातो. स्वामीजींनी युवा स्वाध्यायांवर विशेष भर दिला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अथवा समर्थांची एखादी ओवी घ्यावी, त्यात बुडी मारावी आणि सर्वांगांनी त्यावर आपले चिंतन व्यक्त करावे अशा प्रकारे केंद्रांमधून स्वाध्याय सादर केले जातात.
स्वामीजींनी अध्यात्मपर विपुल वाङ्मय निर्माण केले आहे. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्यायांवरील विवरण ग्रंथ, नित्य उपासना आणि पठण यांसाठी अर्थांसहित अनेक पुस्तिका, श्रीगजानन महाराज, तुकाराम महाराज, स्वामी स्वरूपानंद, श्रीमुकुंदराज यांच्या वाङ्मयावरील त्यांचे विवरण-ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच साधकांना पडण्याऱ्या प्रश्नांची उत्तरे, ध्यानप्रक्रिया आणि अष्टांगयोग विवरण-ग्रंथ, रामरक्षा, अथर्वशीर्ष या नित्य पठणातील स्तोत्रांचे अर्थासहित विवरण अशा अनेक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे.
‘रामकृष्ण-विवेकानंद आणि आपण’, ‘असामान्य लोकमान्य’, ‘दासबोधातील नवविधा भक्तींचे विवरण’, ‘समर्थांचा जाणता परमार्थ’ आणि ‘दासबोधातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयांवरील ध्वनिमुद्रणे संस्थेकडे उपलब्ध आहेत. स्वरूपयोग प्रतिष्ठानचे त्रैमासिक १९९७पासून देश-परदेशांतील हजारो साधकांपर्यंत पोचते. प्रपंच आणि परमार्थ, राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म यांचा सहजसुंदर व प्रेरणादायी मिलाप स्वामीजींच्या जीवनशैलीतून आणि वाङ्मयातून व्यक्त होतो.
‘स्व’चा शोध घेण्याच्या प्रक्रियेलाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ध्यानयोगाचा अभ्यास व आचरण करणारी प्रत्येक व्यक्ती उदात्त विचारसरणीची, व्यापक बुद्धिनिष्ठ व आत्मनिष्ठ व्हावी या भूमिकेतून स्वामी माधवानंद यांनी स्वरूपयोगच्या माध्यमातून समाजशिक्षणाचे उदंड कार्य केले.
डॉ. हिमांशु शरद वझे (स्वामी संविदानंद), पुणे
डॉ. वझे हे एम्.बी.बी.एस्. आणि एम्.डी. (शरीरक्रियाशास्त्र) पदवीधर असून दोन्ही त्यांनी बी.जे. मेडिकल, पुणे येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसिन हायडेलबर्ग, जर्मनी येथून पूर्ण केला.
१९९८पासून स्वामीजींच्या गुरुभगिनी डॉ. सुनीतिताई दुबळे यांच्याकडे दासबोध व ज्ञानेश्वरीचे बारा वर्षे त्यांचे नित्य साप्ताहिक श्रवण घडले व त्याप्रमाणे साधना झाली. तसेच त्यांनी डॉ. सुषमाताई वाटवे, डॉ. स्वर्णलताताई भिशीकर, सरलताई बाबर या नाथ संप्रदायातीलच स्वामीजींच्या अन्य गुरुभगिनींकडून नैमित्तिक श्रवण, अनेक संप्रदायांमध्ये जाऊन वेगवेगळ्या साधनापद्धतींचा अभ्यास व त्याप्रमाणे उपासनादेखील केली. त्यांनी २००८पासून स्वान्तःसुखाय स्वगृही ज्ञानेश्वरी, पातंजल योगसूत्रे इत्यादी विषयांवर ९ वर्षे सुमारे चारशे प्रवचने केली व २०१५ सालच्या गुरुपौर्णिमेपासून स्वामीजींकडे नित्य श्रवण व ध्यानसाधना सुरू झाली. २०१७ डिसेंबरला स्वामीजींच्या भगवद्गीतेतील पाचव्या अध्यायाच्या पुस्तक प्रकाशन समारंभात स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली अभंग-भावतरंग कार्यक्रमाचे सादरीकरण केले. २०१८मध्ये स्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या वर्षीपासूनच युवाकेंद्रात दीर्घ स्वाध्यायाला सुरुवात केली.
अनेक वैद्यकीय महाविद्यालये, पुणे विद्यापीठ, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इत्यादी संस्थांमध्ये बारा वर्षे अध्यापन घडले.
डॉ. वझे हे डॉ. राजीव शारंगपाणी यांचे शिष्य असून त्यांचा क्रीडावैद्यक क्षेत्रातील वारसा ते २१ वर्षे चालवत आहेत. त्यांनी स्वास्थ्य व त्याच्याशी निगडित विषयावर पुण्यात व पुण्याबाहेर सुमारे हजारहून अधिक व्याख्याने केली आहेत. स्वास्थ्याशी निगडित अनेक विषयांवर विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून लिखाण तसेच ‘प्रयोगकलावैद्यकशास्त्र’ हे पुस्तकदेखील त्यांनी प्रकाशित केले आहे, जे पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमात टेक्स्टबुक म्हणून समाविष्ट आहे.
यांशिवाय, पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्याकडून व्हायोलिनचे वादन ते दहा वर्षे शिकले आहेत आणि इंडियन ताइ-ची ॲकॅडमी या सॉफ्ट मार्शल आर्टच्या पुणे केंद्राचे प्रमुख म्हणून नऊ वर्षे कार्यरत आहेत. सुमारे शंभर विद्यार्थ्यांना मार्शल आर्टचे शिक्षण त्यांनी दिले आहे.
दिवंगत समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यासमवेत त्यांच्या विविध संस्थांमध्ये त्यांनी पाच वर्षे सेवा केली आहे. व्यायाम व गिर्यारोहणाची त्यांना विशेष आवड असून हिमालयामध्ये अनेकदा भ्रमंती केली आहे, तसेच अनेक वर्षे ते नियमित सिंहगडवारी करत आले आहेत.
अनुग्रह प्रदान करण्याचे कार्य सुरू होईपर्यंत कंसामध्ये नमूद केलेल्या सांप्रदायिक नावाचा वापर डॉ. वझे करणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
डॉ. अतुल अभय दीक्षित (स्वामी अतुल्यनाथ), गांधीनगर, गुजरात
डॉ. दीक्षित मूळचे डोंबिवलीचे असून सध्या ते इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर, गुजरात, येथे Associate Professor of Mathematics म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षणासाठी ११ वर्षे अमेरिकेत वास्तव्य होते, ज्यामध्ये त्यांनी गणितामध्ये MS, PhD व पुढे postdoctoral research केला आहे. त्यांना २०२१ साली Society for Industrial and Applied Mathematics (SIAM) या अमेरिकेतील संस्थेतर्फे ‘गाबोर झेगो’ (Gábor Szegő) पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवलेले ते पहिले भारतीय आहेत. तसेच २०२१ मध्ये त्यांना गणितामध्ये संशोधन करण्यासाठी पाच वर्षांसाठी भारत सरकारची मानाची ‘स्वर्णजयंती फेलोशिप’ मिळाली.
डॉ. दीक्षित स्वरूपयोगशी १९९९ सालापासून जोडलेले आहेत. भारतात व अमेरिकेत ठिकठिकाणी होणाऱ्या स्वामी माधवानंदांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी गायनसेवा केली आहे. गायन व तबला वाजवणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांच्या आई श्रीमती मधुवंती दीक्षित या त्यांच्या पहिल्या संगीत गुरू. श्रीधर फडके, आदित्य कल्याणपूर, महेश काळे व केनवूड देनार्ड यांच्याबरोबर त्यांनी कार्यक्रम केले आहेत. त्यांना संगीत दिग्दर्शनाचीही आवड आहे. त्यांनी आजवर अनेक अभंगांना व पदांना चाली लावल्या आहेत.
अमेरिकेत असताना डॉ. दीक्षित यांना स्वामीजींचा विशेष सहवास लाभला, तसेच गायन व स्वाध्याय सादरीकरण करताना, अभंग कसे निवडायचे, त्यांमधले ध्यानयोगपर विशेषत्व कसे प्रकट झाले पाहिजे आदी सूक्ष्म आध्यात्मिक धारणांवर स्वामीजींचे विशेष मार्गदर्शन त्यांना प्राप्त झाले. त्यांचे सर्व कुटुंब स्वामीजींचे अनुगृहीत असून स्वरूपयोग संस्थेत अनेक स्तरांवर कार्यात सहभागी आहे.
स्वरूपयोगच्या ऑनलाईन केंद्रांमध्ये डॉ. दीक्षित यांचे प्रबोधनकार्य चालू आहे. तसेच परगावच्या केंद्रांमध्ये त्यांचे नैमित्तिक दौरे होत असतात.
१. शुक्रवार ध्यानकेंद्र, भांडारकर रोड, पुणे. शुक्र. सायंकाळी ७.३० ते रात्री ९ (श्री. योगेश काळे)
२. शनिवार ध्यानकेंद्र आणि सत्संग, कर्वेनगर पुणे, पहिला आणि तिसरा शनिवार, सकाळी ७ ते ८.३० (डॉ. श्री. गजानन नाटेकर)
३. रविवार प्रातःकाळ उपासना, कर्वेनगर पुणे, ध्यान व ज्ञानेश्वरी निरूपण, सकाळी ६ ते ८ (डॉ. श्री हिमांशू वझे)
४. ऑनलाईन केंद्र, स्वामीजी ध्यानपूर्व विवरण रेकॉर्डिंग व ध्यान, सोम - गुरु - शुक्र, सायंकाळी ३.३० ते ५ (सौ. स्वाती दामले)
सायंउपासनेचे संध्या-वंदन हा एक अलौकिक, दैवी अनुभव साधकांना घेता येतो. शिव ध्यान मंदिराच्या गच्चीवर, निळ्याशार आकाशाच्या कुशीत बसून, मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी नटलेली सुंदर पर्वतरांग, निसर्गाची अशी निखळ विशालता आणि या निर्मळ निसर्गरम्य वातावरणात साधक भगवंताच्या २४ नामांचा जप करतो, भगवान विष्णूंची स्तुती करतो, अर्थासहित गायत्री मंत्राचा त्रिवार जप करतो आणि “ओम नमः शिवाय” या नाममंत्राचा उच्चार करून, शांतपणे अंतरंगात उपासनेची सांगता करतो. सहजतेने साधकाचे लक्ष आत वळते, “स्व-भाव” सहजच अंतःकरणात प्रकट होतो, फक्त “असण्याचा” एक क्षण... कोणत्याही आंतरिक गोंधळापासून मुक्त आणि त्या क्षणी राहते ती फक्त कृतज्ञता. सर्व साधकांनी ही उपासना नक्की अनुभवावी.
कार्यशाळांचा एक भाग म्हणून, साधकांना स्वामीजींचे ध्वनिमुद्रित प्रवचन किंवा उत्तराधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष प्रवचन ऐकायला व पाहायला मिळते. सर्व प्रवचने वैज्ञानिक दृष्टीकोनावर तसेच आत्म-प्राप्तीच्या मार्गाच्या तार्किक स्पष्टीकरणावर केंद्रित असतात. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद दासबोध, पतंजली योगसूत्र आणि ज्ञानेश्वरी यांसारख्या मूलभूत आध्यात्मिक ग्रंथांपासून ते सर्व प्रेरणा घेतात.
मध्यवर्ती आध्यात्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास करणे आणि त्यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनपर निरूपणांचे श्रवण करणे, त्यावर स्वतंत्र चिंतन-वाचन करून अभ्यासपूर्ण स्वाध्याय करणे हा उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे. स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्य वाचनाचा दैनंदिन उपासनेमध्ये समावेश होतो.
स्वामीजींनी आखून दिलेल्या मध्यवर्ती नियमावलीनुसार पहाटे, दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा आश्रमात उपासना केली जाते. पवित्र शिवमंदिरात शांत, निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान हा साधकांच्या विशेष आकर्षणाचा भाग आहे.
आश्रमातील दैनंदिन कार्यक्रमांची सुरुवात पहाटेच्या ध्यानाने होऊन, काकड आरतीने सकळच्या उपासना सत्राची सांगता केली जाते. त्यानंतर दुपारी सद्गुरुस्तवन व सद्गुरूंची आरती आणि रात्री श्रीराम व हनुमंत यांची आरती केली जाते. तसेच प्रत्येक वाराप्रमाणे विशेष आरत्या म्हटल्या जातात. आरतीनंतर वाराला अनुसरून विशेष स्तोत्र, योग-भक्ती-ज्ञानपर श्लोकपठण, नामस्मरण व संतपरंपरेचा जयजयकार नित्य केला जातो.
श्री. श्रीराम मधुसूदन देशपांडे (स्वामी श्रीरामनाथ), अमेरिका
भारतात पुण्यामधून २००६ साली कम्प्यूटर इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर श्री. देशपांडे यांनी दोन वर्षे भारतामध्ये IT मध्ये काम केले. त्यांना ‘Most promising Fresher’ हे award देण्यात आले. २००८मध्ये त्यांना अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये एम. एस. ही पदवी संपादन केली. आधी फ्लोरिडा येथे ते कार्यरत होते आणि नंतर २०१२पासून कॅलिफोर्नियात स्थायिक झाले. सध्या ते सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतात.
पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्याकडे ते आईवडिलांसह कोवळ्या वयात अवघे ८ वर्षांचे असल्यापासून जाऊ लागले, व नंतर युवा वयामध्ये स्वामी माधवानंद यांच्याकडील युवाकेंद्राचे ते नियमित सदस्य आणि कार्यकर्ते झाले. त्यांना प्रथम पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्याकडून आणि नंतर पूजनीय स्वामी माधवानंद यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला. अमेरिकेतील ऑनलाईन केंद्रात, तसेच बालकेंद्र आणि किशोरकेंद्र यांमध्ये त्यांचे प्रबोधन असते. स्वामी माधवानंद अमेरिकेतील दौऱ्यात त्यांच्याकडे अनेकदा निवासाला जात असत. त्यामुळे त्यांना स्वामीजींचा बराच सहवास लाभला आणि त्यामधून खूप शिकता आले.
गेली अनेक वर्षे श्री. देशपांडे दासबोध, भगवद्गीता व ध्यानयोग यांवरील अभ्यास व स्वाध्याय सादरीकरण करत आहेत. अमेरिकेमधील मुलांना कळेल, आवडेल अशा सोप्या इंग्लिशमधून त्यांना अध्यात्माची रुची निर्माण करण्याचे काम ते सध्या करत आहेत.
श्री. मंदार मालती भालचंद्र लेले (स्वामी मंदारनाथ), कल्याण, महाराष्ट्र
श्री. लेले यांनी कॉमर्समध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले व त्यानंतर PWD इलेक्ट्रिकल लायसन्स प्राप्त करून ‘पिरॅमल हेल्थ केअर, ठाणे’ या कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून २ वर्षे नोकरी केली. पुढे १९९१ ते २०१८पर्यंत त्यांनी स्वतंत्र व्यवसाय (इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिसेस) केला आणि २०१८पासून संपूर्ण वेळ स्वामीजींच्या आशीर्वादाने ते आध्यात्मिक प्रबोधन सेवेत कार्यरत झाले.
श्री. लेले यांना पू. सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि पुढे पू. सद्गुरू स्वामी माधवानंद यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला आणि १९९७पासून सद्गुरू पू. स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची आध्यात्मिक साधना सुरू झाली. १९९७ सालापासून, ‘स्वरूपयोग प्रतिष्ठान’च्या मुंबई विभागातील कल्याण केंद्राचे ‘केंद्रचालक’ म्हणून ते कार्यरत आहेत.
२०१०पासून पू. स्वामीजींच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने कल्याण, ठाणे, दापोली, सांगोला, पुणे, सांगली अशा विविध ठिकाणी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर व स्वामी विवेकानंद या विषयांवर त्यांची अखंड प्रवचनसेवा सुरू आहे. त्यांच्या आईंच्या आणि वडिलांच्या दोन्ही घराण्यांमधून अनेक पिढ्यांपासून परंपरेने चालत आलेला मोठा आध्यात्मिक वारसाही त्यांच्यामागे उभा आहे.
स्वरूपयोगच्या ऑनलाईन केंद्रांमध्ये श्री. लेले यांचे प्रबोधनकार्य चालू आहे. तसेच परगावच्या केंद्रांमध्ये त्यांचे नैमित्तिक दौरे होत असतात.
डॉ. गजानन दिगंबर नाटेकर (स्वामी गजानननाथ), पुणे
डॉ. नाटेकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून सध्या इन्शुरन्स क्षेत्रात medicolegal audit विभागात कार्यरत आहेत. मूळचे रत्नागिरीचे असून २००१ साली वयाच्या १७व्या वर्षी त्यांना स्वामी माधवानंदांचे प्रथम दर्शन व अनुग्रह प्राप्त झाला आणि त्यानंतर स्वरूपयोगच्या रत्नागिरी युवाकेंद्रामध्ये ते सहभागी झाले.
सावंतवाडी येथे वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही केंद्रात उपासना आणि स्वाध्याय यांत त्यांचा नित्य सहभाग होता. पुढे शिक्षणानंतर पुण्यात आल्यावर पुणे युवाकेंद्र, ध्यानकेंद्र, बालकेंद्र, शिबिरे यांमध्ये साधक-कार्यकर्ता म्हणून राहण्याची संधी त्यांना मिळाली. वैयक्तिक आवड आणि स्वामीजींच्या निर्देशानुसार तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार त्यांचा भगवद्गीता, दासबोध, तुकाराम महाराजांची गाथा आणि संतवाङ्मय यांचा अभ्यास आणि साधना चालू आहे. स्वामीजींच्या आज्ञेनुसार त्यांनी पुणे युवाकेंद्रामध्ये २०१८पासून श्रीमत् दासबोधावर दीर्घ स्वाध्यायांचे सादरीकरण केले आहे.
डॉ. नाटेकर सध्या पुण्यात दोन ध्यानकेंद्रांमध्ये मार्गदर्शन करतात. तसेच युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांचे प्रबोधनकार्य चालू आहे. स्वरूपयोगच्या परगावच्या केंद्रांमध्ये त्यांचे नैमित्तिक दौरे होत असतात.
नाथ संप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे एक अध्वर्यू स्वामी माधवानंद यांनी १९९७ साली स्वरूपयोग प्रतिष्ठानची स्थापना केली. भगवान श्री आदिनाथांपासून ते ज्ञानेश्वर महाराज, पुढे पावस चे स्वामी स्वरूपानंद, मग स्वामी माधवनाथ आणि त्यांचे एक उत्तराधिकारी शिष्य म्हणजे स्वामी माधवानंद, उर्फ डॉक्टर. माधव नगरकर हे होय.
सहजसोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शुद्ध अध्यात्म सर्वांपर्यंत पोचावे, तसेच राष्ट्रीयत्वाचीही जोपासना व्हावी हा ‘स्वरूपयोग’चा मुख्य उद्देश, आणि त्यासाठी ध्यानमार्गाचा (Meditation) अवलंब ही मध्यवर्ती उपासना आहे.
संस्थेच्या देश-विदेशांतील केंद्रांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, योगसूत्रे, संत-जीवनचरित्रे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस अशा राष्ट्रपुरुषांच्या उत्तुंग गुणगाथांचा अभ्यास चालतो.
विशेष करून युवा पिढीपर्यंत पोचण्याच्या उद्देशाने युवाकेंद्रे, ध्यानकेंद्रे, बालकेंद्रे, उपासना-शिबिरे असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे योजले जातात. त्याचप्रमाणे स्वामी माधवानंदांचे सर्व वाङ्मय साधकांपर्यंत पोचवणे हा संस्थेच्या कार्याचा विशेष भाग आहे.
‘स्वरूपी राहणे हा स्वधर्म’ हे समर्थवचन ‘स्वरूपयोग’चे ब्रीदवाक्य आहे. ईश्वराचा शोध अंतरातच घेतला पाहिजे, आणि ‘देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो’ हे स्वा. सावरकरांचे वाक्य साधकांनी विसरू नये, हीच स्वामींची सर्वांना प्रेरणा आहे!
यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् । स्वामी स माधवानन्दो नित्यं वसति मे हृदि ॥ (अर्थ: क्षणभरि स्मरता ज्या चित्त होते विशुद्ध । हृदयि वसत स्वामी माधवानंद सिद्ध ॥) ।। हरी: ॐ ।।
पूजनीय श्री. शैलेश सोहोनी, अमेरिका
शैलेश दादा गेली ३० वर्षं अमेरिकेत स्थायिक आहेत , व सध्या PwC ह्या IT कंपनी मध्ये डायरेक्टर ह्या पदावर रुजू आहेत. १९९० साली पूजनीय सद्गुरू स्वामी माधवनाथ यांची भेट होऊन १९९२ ला यांना अनुग्रह प्राप्त झाला व जेवणाची दिशा बदलली.
१९९३-९४ मध्ये नोकरीसाठी ते अमेरिकेत गेले व पुढे २००२ पासून पू. स्वामी माधवानंद अमेरिकेत जाऊ लागले आणि स्वामीजींचा निवास बऱ्याच वेळा शैलेश दादांकडे असे. ज्ञानेश्वरी-दासबोध यांचा सूक्ष्म अभ्यास कसा करायचा हे विशेषत्वाने स्वामीजींकडून शिकायला मिळालं.
स्वामीजींनी २००२ साली जॅक्सनव्हिल येथे केंद्र सुरु केले. स्वामीजींच्या आशीर्वादाने, ह्या केंद्रात शैलेश दादांचे ज्ञानेश्वरीवर स्वाध्याय-निरूपण सुरु झाले व पुढे २० वर्षं अखंड चालले आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचे एक आवर्तन पूर्ण झाले. भगवद्गीता, ध्यानयोग या विषयांवरही शैलेश दादा सखोल चिंतन करून मांडणी करतात.
Do you really want to cancel the process??